नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी दि. १७ मार्च रोजी दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. आज पर्यंत नागपूर मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही हिंसाचाराची घटना घडली नव्हती, पण दोन दिवसांपूर्वीच्या हिंसाचाराचे पडसाद सर्वत्र उमटत असून, सध्या शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातचं आता नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती महाराष्ट्रातील शांतता आणि सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी स्थानिकांशी चर्चा करील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कळवले आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत ९० जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दंगलखोर अजूनही लपून बसले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागले आहे. सायबर सेल उपलब्ध सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.