राहुरी: राहुरी शहरातील श्री बुवासिंद बाबा तालीम येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबन केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे तीव्र पडसाद उमटले असून सहस्रो शिवप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरले. कडकडीत बंद पाळण्यात आला. मनमाड महामार्ग रोखण्यात आला. व्यापार्यांनी तात्काळ दुकाने बंद केली. संतप्त शिवप्रेमी जनतेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी राहुरी नगर परिषदेतील लिपिक हरिश्चंद्र बिवाल यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दिली आहे. शहरात तणावाचे वातावरण असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध चालू आहे. पोलिसांनी माथेफिरू आरोपीला तातडीने अटक करावी; अन्यथा राहुरी तालुका बेमुदत बंद ठेवण्यात येईल, अशी चेतावणी शिवप्रेमी जनतेने दिली आहे.
या घटनेनंतर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. सध्या राहुरी तालुक्यातील गावे आणि राहुरी, तसेच गुहा गाव बंद ठेवण्यात आले आहे.