पुणतांबा: जय बाबाजी भक्त परिवाराच्या सुमारे दीड हजार महिला पुरुषांनी येथे पुरातन मंदिरे व घाट दुरुस्तीसाठी राबवलेल्या एकदिवसीय महाश्रमदान शिबिरामुळे दक्षिण काशीचे म्हणजेच पुणतांब्याचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे. यामुळे भाविकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
पुणतांबा येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या श्रीमंत अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांची, घाटांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. तसेच गेल्या दोन महिन्यापूर्वी मंदिरातील मूर्तीची विटंबना झाली होती. यावेळी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी भेट दिली असता नदी घाटावरील विविध मंदिरांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी मंदिरे व घाट दुरुस्ती करिता पुणतांबा ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेत जय बाबाजी भक्त परिवारला काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
शासनाच्या विविध विभागाची कायदेशीर पूर्तता करून महाराष्ट्रातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक यासह इतर जिल्ह्यांतील जय बाबाजी भक्तांच्या मदतीने विना मोबदला श्रमदानात अनेक कारागिरांच्या सहकार्याने रविवारी सकाळी मंत्रविधी पूजा करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. स्वतः शांतीगिरी महाराज मार्गदर्शन करण्यासाठी तीन दिवस पुणतांबा येथे राहणार असून मंदिर दुरुस्ती सेवा समितीच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर घाटावरील विविध मंदिरे, घाट तसेच मामाभाचे घाट व मंदिर दुरुस्तीचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. या महाश्रमदान शिबिराला सुदर्शन न्यूज चॅनेलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश चव्हाणके यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्रमदान शिबिरात उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
या कामासाठी आर्थिक, श्रमदान आदी मदतीचा ओघ सुरू आहे. या निष्काम सेवेसाठी येणाऱ्या भाविकांना राहण्याची भोजनासह सर्व व्यवस्था करण्यासाठी मंदिर दुरुस्ती सेवा समिती व पुणतांबा गावातील तरुण, पुरुष, महिला ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत. या मोहिमेला पुणतांबेकर यांनी मोठे योगदान दिले आहे.