करोना विषाणू संसर्गात वाढ होऊ नये याची खबरदारी म्हणून राज्यातील जनतेने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन केल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
थंडीच्या वातावरणात फटाक्यांचा धूर वर जाण्याऐवजी खालीच पसरण्याची शक्यता असल्यामुळे त्याचा श्वसनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल, सरकारांनी दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणलेली आहे. करोना प्रादुर्भावाच्या संदर्भात जनतेने आपली काळजी घ्यावी म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
शनिवापर्यंत प्रयोगशाळांमधील राज्यातील करोना चाचण्यांची संख्या ९३ लाख ७८ हजारांपेक्षा अधिक झाली. यापैकी १७ लाख १४ हजार नमुने करोनाबाधित निघाले. १६ लाख ६९ हजारांपेक्षा अधिक (९१.५३ टक्के) रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.६३ टक्के आहे.
दरम्यान, रविवापर्यंत जालना जिल्ह्य़ात आलेल्या एकूण ७४ हजार ४७१ चाचण्यांपैकी ११ हजार ३२७ नमुने करोनाबाधित आढळले. करोनाबाधित नमुन्यांचे प्रमाण १५.७ टक्के आहे. एकूण चाचण्यांपैकी ४४ हजार १३६ आरटीपीसीआर तर ३० हजार ३३५ प्रतिजन चाचण्या घेण्यात आल्या. जालना जिल्ह्य़ात आतापर्यंत १० हजार ४७९ म्हणजे ९२.५१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुळे आतापर्यंत २९९ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
मृत्यूचे प्रमाण २.५४ टक्के आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत ७९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. करोना रुग्णांच्या संपर्क आणि सहवासातील अधिक काळजीच्या जवळपास ७० हजार व्यक्तींचा शोध आतापर्यंत जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. तर जवळपास एक लाख १० हजार कमी काळजीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.