गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील ओमायक्रॉनचा फैलाव आता होऊ लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे. देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यातच अहमदनगरच्या एका विद्यालयात तब्बल १९ विद्यार्थी करोना पॉझिटीव्ह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत ५वी ते १२वी पर्यंत वर्ग असून ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, असेही अधिकाऱ्यांने सांगितले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या तीन ते चार दिवसांत १९ विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सर्वांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक संक्रमित विद्यार्थ्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. तर काहींमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसत होती.”
शाळा बंद करण्याचा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा..
देशात ओमायक्रॉनची भीती वाढत असताना, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असे तीन दिवसांपूर्वी म्हटले होते. महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता वर्तवली होती. राज्यात ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते, असं गायकवाड यांनी म्हटलं होतं.
शुक्रवारी राज्यात ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण..
शुक्रवारी दिवसभरात राज्यात ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुण्यात, मुंबईत ११, साताऱ्यात २ तर अहमदनगरमध्ये १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे. यापैकी सर्वाधिक ४६ रग्ण मुंबईत आहेत