अमेरिकन डॉलरमध्ये (USD-US Dollar) आलेल्या तेजीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर (Gold Price Down) घसरले आहेत. याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावर देखील झाला आहे. बुधवारी देशांतर्गत वायदे बाजारात सोनेचांदीच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 233 रुपयांनी कमी होऊन 51120 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. आधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर 51153 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते आणि आज सकाळी देखील सोन्यात घसरण होत 51165 रुपये प्रति तोळाने किंमत सुरू झाली होती.
डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये 605 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे चांदीची वायदा किंमत 67889 रुपये प्रति किलो इतकी होती. आधीच्या सत्रामध्ये चांदी 68494 रुपयांवर बंद झाली होती. तर आज सकाळी घसरणीनंतर 68056 रुपये किंमतीवर चांदी उघडली होती.
तज्ज्ञांच्या मते आज सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसेल. मात्र मोठी घसरणीची शक्यता नाही आहे. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 51.867 रुपये प्रति तोळावरून वाढून 51,989 रुपये प्रति तोळा झाले होते. या दरम्यान सोन्याचे दर 122 रुपयांनी वाढले होते. मंगळवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली होती. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 69,325 रुपयांवरून वाढून 69,665 रुपये प्रति किलो झाली होती.