महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. राज्यात लॉकडाउन कधी उठणार असे सवाल विचारले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत लॉकडाउन कधी आणि कसा उठवणार याबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. तसंच ‘‘लॉकडाऊन उठवा, हे उघडा आणि ते उघडा असे सांगणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत काय? पुनश्च हरिओमचा अर्थ समजून घ्या.’’ असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या पहिल्या भागात राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
' कोरोनासारखं संकट येतं ज्याच्याबाबतीत आपण खबरदारी घेतली नाही तर झपाट्याने लोकं आजारी पडतात आणि मृत्युमुखी पडतात, पण वादळासारखं संकट जसा ‘निसर्ग’ वादळाचा उल्लेख तुम्ही केलात. भूकंप येतो. हे एका क्षणात ज्याला आपण निमिषार्धात म्हणतो…होत्याचं नव्हतं करून टाकतात आणि त्यानंतर आपल्याला फार जिकिरीने जे लोक अशा संकटात अडकले असतील त्यांना सोडवण्याचं काम करावं लागतं. त्यांच्या पुनर्वसनाचे काम करावे लागते. परंतु, त्या वेळेला हे संकट येऊन गेल्यानंतर कुठे काय नुकसान झालंय हे आपल्याला कळतं. जसं आताच ‘निसर्ग’ चक्रीवादळ आलं होतं. त्यावेळी सुदैवाने सुरुवातीपासून आपण काळजी घेतली म्हणून प्राणहानी कमी करू शकलो. अर्थात जेवढी हानी झाली तेवढीसुद्धा खरंतर होता कामा नये. पण हानी आपण कमीतकमी ठेवू शकलो. मर्यादित ठेवू शकलो. तिकडे विजेचे खांब उन्मळून पडले. झाडं, वृक्ष, बागांचे नुकसान झाले. घरांचं नुकसान झालं. शेतीचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई आपण आता करतो आहोत.' असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.