सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग अँगलप्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष तपास पथकानं (एसआयटी) सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिला बुधवारी चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. दरम्यान, एसआयटीचा एक सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ही चौकशी स्थगित करुन श्रुतीला परत घरी पाठवण्यात आलं.
एनसीबीनं श्रुती मोदीला चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी मंगळवारी समन्स बजावलं होतं. त्यानुसार, श्रुतीनं आज (बुधवार) एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली. मात्र, त्याचवेळी चौकशी पथकातील एक सदस्याचा अँटीजेन चाचणी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे नियमानुसार या पथकातील इतर सदस्यांची देखील करोना चाचणी करावी लागणार असल्याने श्रुती मोदीला पुन्हा पाठवून देण्यात आले, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांन दिली.
सीबीआयनं दाखलं केला एफआयआर
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या सहा जणांपैकी एक श्रुती मोदी आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी ही सहा नावं आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करताना रियासोबतच श्रुतीचंही नाव घेतलं होतं. त्यांच्या तक्रारीच्या आधारेच बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती.