जळगाव: जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावहून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या. परंतु, दुर्देवाने समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. पण या अपघातात जवळपास १० प्रवासी मृत पावल्याचे समजत आहे. तर या दुर्घटनेत एकूण ४० जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. या अपघातात १० प्रवासी ठार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जळगावातील पाचोरा येथील परधाडे येथे हा अपघात झाला आहे.
ही ट्रेन परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे ३५ ते ४० प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही? याची खात्री त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.