समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी अभिनेता आणि गोरखपूर खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रवी किशन यांनी फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग व्यसनाबाबत भाष्य केले होते. त्यांचे नाव न घेता जया बच्चन यांनी किशन याच्यावर टीका केली आहे. 'जिस थाली में खाते है उसी में छेद करते हैं' अशा शब्दात जया बच्चन यांनी टीका केली आहे.
Bollywood मध्ये गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह प्रकरणामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर आल्याने अनेक खुलासे करण्यात आले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला यामध्ये एनसीबीने अटक देखील केली आहे. यानंतर बॉलिवूडच्या प्रतिमेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यानंतर खासदार रवी किशन यांनी देखील सोमवारी बॉलिवूडची निंदा केली, त्यानंतर जया बच्चन यांची आज प्रतिक्रिया समोर आली आहे.
जया बच्चन यांनी ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या होणाऱ्या बदनामीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'लोक बॉलिवूडला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही दिवसांपासून बॉलिवूडला बदनाम केले जात आहे. फक्त काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीवर कलंक ठेवू शकत नाही. मला खरोखर लाज वाटली की काल लोकसभेतील एक सदस्य, जे इंडस्ट्रीत आहेत, त्यांनी फिल्म इंडस्ट्रीविरूद्ध भाषण केले.'
'कुछ लोक जिस थाली में खाते है उसी में छेद करते हैं', असं म्हणत त्यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. सोमवारी रवी किशन यांनी इंडस्ट्रीतील वाढत्या ड्रग कनेक्शनबाबत चिंता व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार रवी किशन यांनी सुशांत सिंह राजपूत तपासात फिल्म इंडस्ट्रीवर उद्भवलेल्या ड्रग्ज-संबंधी आरोपाबाबत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. पाकिस्तान आणि चीनने देशातील तरूणांना संपुष्टात आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला.