मुंबई: सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मनसे आणि भाजपमध्येही वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू असतांना भाजपा मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील भूंखंडांच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात ठाकरे गट आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे हे मुंबईतील विविध भूखंडांवर होत असलेल्या कथित घोटाळ्यांचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये नेहमी जमीन आणि लँड स्कॅम हेचं चालू असते, अशी जहाल टीकाही त्यांनी केली. गरवारे क्लबमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यशाळेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलतांना आशिष शेलार म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी नवीन काही बोलायचं सोडून दिलं आहे. आता ते सतत अमुक जमीन अदानीला दिली, तमुक जमीन अंबानीला दिली अशा आरोपांमध्येच अडकून पडले आहेत.