नागपूर: नागपूरमध्ये जवळपास दोन हजार दोनशेपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक व्यवसायाच्या निमित्ताने राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यात सर्वधर्मियांचा समावेश आहे. भारत सरकारकडून त्यांनी रितसर व्हिसा घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कायदेशीर ठरते. परंतु, पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडावा, असे निर्देश दिले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तसेच याबाबत गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षाविषयक केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर नागपुरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात पोलीस प्रशासनाला अधिकृत निर्देश अद्यापही प्राप्त झाले नाहीत. खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन ही मोहीम राबवत आहे. नागपुरात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची पोलीस विभागाकडे अधिकृत माहिती असली तरी ‘व्हिसा’ संपल्यानंतरही ते नागपुरात वास्तव्यास आहेत काय? कोणता व्यवसाय करतात? अशी माहिती नव्याने घेतली जात आहे.