दिल्ली: भारतीय गायीच्या शेणाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भारतातून वर्ष २०२३ - २४ या आर्थिक वर्षात तब्बल ३८६ कोटी रुपयांचे परकीय चलन भारतात शेणापासून उपलब्ध झाले आहे. ‘एक्झमपेडिया’ या वस्तूंच्या आयात आणि निर्यातीशी संबंधित विषयांचा अभ्यास करणार्या आस्थापनाने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. गायीचे शेण असलेल्या ‘कंपोस्ट खता’चीही वर्षभरात ८८ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.
भारतीय गायीचे शेण हे शेतीसाठी संजीवनी ठरते, असे परदेशातील अनेक शेतकरी मानतात. मालदीव, चीन, नेपाळ, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कुवेत, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, ब्राझिल, अर्जेंटिना आदी देशांत भारतीय गायीचे शेण अथवा तिच्या पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे. गायीच्या शेणापासून बनवलेले १७३ कोटी रुपये मूल्याचे खतही निर्यात झाले. ३८६ कोटी रुपयांपैकी जवळपास १२५ कोटी रुपये मूल्याचे निवळ शेण परदेशात निर्यात करण्यात आले आहे.