शिर्डी: साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगामी काही दिवसातच नाईट लँडींग विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होईल. तसेच या विमानतळावरून देशांतर्गत सेवा वाढवण्याबरोबरच अंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सामान्य साईभक्तांना विमानसेवेचा लाभ घेता यावा, यासाठी शिर्डी एअरपोर्ट उडाण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली.
केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री मोहळ म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली. त्यानुसार अमित शाह यांनी मागील आठवड्यातच शिर्डी एअरपोर्टसाठी सीआयएसएफचे मनुष्यबळ वाढवून देण्याचे निर्देश दिले आहेत. नाईट लँडींगबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून पंधरा दिवसात शिर्डीतून विमानांची नाईट लँडींग आणि टेकऑप सुरू होईल."