बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावात अचानक केस गळती आणि टक्कल पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे प्रकार समोर आल्यानं आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली होती. देशात एचएमपीव्ही या व्हायरसने दस्तक देऊन नागरिकांमध्ये दहशत माजवलेली असतानाच बुलढाण्यात वेगळ्याच आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.या प्रकरणाची दखल आता केंद्रानेही घेतली आहे. केंद्र सरकारच्या आयुष विभागाचे आयसीएमआर पथक बुलढाण्यात दाखल झाले आहे.
शेगाव तालुक्यात केस गळती होत असलेल्या भागात केंद्र सरकारच्या आयुष विभागाचे पथक पोहचले. आयसीएमआरचे पथक मंगळवारी सकाळी गावांमध्ये येणार असून, यावेळी तालुका अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेणार आहेत, असे समजते. बाधित ११ गावातील पाण्याचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात आर्सेनिक, लीड, मक्युरी आणि कॅडमियम आढळून आलेले नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सर्व बाधितांच्या केसांचे, नखांचे, डोक्याच्या त्वचेचे नमुने बायोप्सी चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.
सर्व प्रकारची चाचणी केली, मात्र अहवाल निगेटिव्ह आला. 'फंगल इन्फेक्शन' दिसले नाही. ११ गावांतील ६५ नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासले त्यात केसगळतीशी कारणीभूत कोणतेही घटक आढळले नाहीत. त्यामुळे ही केस गळती नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याची माहिती घेण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथक बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले. दरम्यान, केस गळण्याच्या भीतीने अनेक नागरिकांनी आठवडाभर आंघोळही केली नाही.