नवी दिल्ली: दहशतवाद्यांना आम्ही कठोर उत्तर देऊ, असा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून केला. मासिक ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. या आक्रमणानंतर भारताकडून आतापर्यंत उचलण्यात आलेल्या पावलांची पंतप्रधानांनी माहिती दिली, तसेच पीडित कुटुंबांना न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आतंकवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता हीच आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक दृढ निर्धार करावा लागेल. आतंकवादी आणि त्यांचे म्होरके हे काश्मीरला उद्ध्वस्त करू इच्छितात. त्यामुळेच त्यांनी एवढा मोठा कट रचला. पहलगाम अक्रमण हे आतंकवादाला आश्रय देणार्यांच्या निराशेचे प्रतीक आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. आता कुठे काश्मीर पूर्वपदावर येत होते; परंतु आतंकवाद्यांना ते पहावले नाही. आतंकवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतियांसमवेत उभे आहे.
तसेच, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे भारताची परंपरा आणि मूल्ये यांना सामावून घेते. जगभरातील नेत्यांनी या आक्रमणाची निंदा केली. त्यांनी मला दूरभाष करून, पत्र पाठवत आणि संदेश देत या लढाईत भारतासमवेत असल्याचे सांगितले.