आतापर्यंत मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जात होते. अधिकृत कागदपत्रांवरही काही जणांनी आई आणि वडिलांची नावे लावण्याची पद्धत सुरू केली आहे. राज्यात लवकरच चौथे महिला धोरण आणले जाणार आहे. या धोरणानुसार आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौथ्या महिला धोरणाविषयी भाष्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”