मुंबई: नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि.16) नागपुरात सुरू होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नाही. तर भाजप त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार आहे. असे असताना आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
येत्या 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. बुधवारी रात्री अमित शहांसोबतच्या बैठकीत महायुतीने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तारीख निश्चित केली आहे. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना कोणकोणती खाते मिळणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले. या बैठकीत नवे मंत्रिमंडळ कसे असेल, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गृहखाते, महसूल खाते दिले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास मंत्रालय देण्यात येईल. यासोबतच भाजप स्वत:कडे 20 मंत्रिपद ठेवू शकते. तर शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 10 मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.