मुंबई: गेली अडीच वर्षे रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मंगळवारी जाहीर केली. त्यानुसार उद्या, गुरुवार, १९ डिसेंबर रोजी सभापतिपदासाठी निवडणूक होईल. यासाठी आज दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. भाजपच्या बहुमतामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
रामराजे नाईक - निंबाळकर यांची ७ जुलै २०२२ रोजी सदस्यत्वाची मुदत संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम ६ मधील तरतुदीला अनुसरून सभापती निवडणुकीसाठी १९ डिसेंबर हा दिवस निश्चित केला असल्याचे डॉ. गोर्हे यांनी सांगितले. काल विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच डॉ. गोर्हे यांनी राज्यपाल पी.सी.राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार सभापतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकड अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी आलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम उमेदवार निश्चित केले जातील, असेही उपसभापती यांनी सांगितले.