मुंबई: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. यासंदर्भात काल, सोमवार दि. १३ जानेवारी रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या मुंबईतील खासदार, आमदार, नेते आणि उपनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकीपूर्वी संघटना मबजूत करण्याचे निर्देश शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खा. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचा भव्य मेळावा होणार आहे. यात पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विजयी आमदार आणि खासदारांचा सत्कार केला जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी यावेळी दिली. पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल केले जातील. तत्पूर्वी मुंबईत २४ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाईल. आतापर्यंत सगळ्यात मोठी सभासद नोंदणी असेल, असा विश्वास कदम यांनी यावेळी व्यक्त केला.