भाईंदर: भाईंदर पूर्वेच्या आर. एन. पी पार्क परिसरात काही बेकायदा तबेले आहेत. या तबेल्यांमध्ये पाळीव गायी आणि म्हशी आहेत. या गायींना एकदम कमी जागेत, दाटीवाटीने घाणीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्याच ठिकाणी त्या घाणीत चारा टाकणे, दूध काढणे तसेच सदरील जागा सीआरझेड परिसरात असून कांदळवन जागेत त्याठिकाणी तबेला चालवितांना कोणताही वैध परवाने नसतांना सुद्धा बेकायदा तबेला चालवून त्यातून व्यवसाय केला जातो.
याप्रकरणी महापालिका पशू संवर्धन विभागाच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात तबेला मालक असलेल्या ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा - भाईंदर महापालिका पशु संवर्धन विभागाच्या पथकाकडून भाईंदर पूर्वेच्या आर. एन. पी पार्क येथे असलेल्या बेकायदा तबेल्याची पाहणी करण्यात आली होती. यावेळी गायी व म्हशी यांना एकदम कमी जागेत व दाटीवाटीने ठेवल्याचे दिसून आले.
एकदम कमी जागेत गाय, म्हशी व वासरे असे १४१ जनावरे ठेवण्यात आली होती. तसेच गायीच्या मलमुत्राची घाण गोठ्यात सर्वत्र पसरलेली असल्याचे निदर्शनास आले. तसेच गोठ्यातील गायींचे मलमुत्र नाल्यात व कांदळवनातील मोकळ्या जागेत सोडल्याचे निदर्शनास आले होते. गोठ्याच्या आजुबाजुस मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती आहे. त्या गोठ्यातील गायीच्या मलमुत्राची घाण सर्वत्र पसरलेली आढळून आली.
गायी, म्हैस, बकरी या जनावरांचे पालन करण्यासाठी तसेच दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पशुवैद्यकीय विभागात सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्या व्यवसाय धारकांनी परवान्याबाबतची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. तसेच व्यवसाय धारकांनी तरतुदीतील नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध कलमांतर्गत रमेश यादव, राजेश यादव, उमेश मिश्रा, सुशिल मिश्रा या व्यवसाय धारकांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा - भाईंदर शहरात असे बेकायदा तबेले आहेत त्या तबेल्यांची देखील तपासणी करुन नियमांचे उल्लंघन करणार्या तबेले मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे हे करत आहेत.