पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी - मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षेच्या सभागृह प्रवेशपत्रांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला होता; मात्र त्यावर शिक्षणतज्ञांनी खेद व्यक्त केला. त्यामुळे शिक्षण मंडळाने माघार घेत प्रवेशपत्रे रहित केली असून ‘जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जातील’, असे घोषित केले आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे.
यंदाच्या प्रवेशपत्रांवर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक आणि केंद्रच्या नावांचा उल्लेख करत प्रथमच प्रवर्ग उल्लेख केला होता. शाळेत विद्यार्थ्याच्या जातीची नोंद योग्य झाली आहे का? हे पालक आणि विद्यार्थी यांना कळावे, यासाठी हा उल्लेख असल्याचे स्पष्टीकरण मंडळाकडून देण्यात आले होते.
बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी २४ जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी २० जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.