मुंबई: अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, की केईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत. अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली.जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले.
भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात १९६८ मध्ये झाली. त्यानंतर २०२४ रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाण्ट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात १९८७ साली डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.