मुंबई: धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निवडणूक शपथपत्रात माहिती दडवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर होत आहे. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. हायकोर्टाकडून धनंजय मुंडे यांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यामुळे आधीच अडचणींचा सामना कऱणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्याची चर्चा होत आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण आर. पेडणेकर यांनी प्रतिवादींसह मंत्री धनंजय मुंडे व इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. या निवडणूक याचिकेवर २० फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंडे यांनी शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केला नाही. करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने, तसेच बँकेतील जॉइंट अकाउंट, मालमत्ता व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे यांची माहिती दडवून ठेवली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
निवडणुकीपूर्वी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल करून परळी मतदारसंघातील २३३ पैकी १२२ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्याची विनंती केली होती. याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून लोकशाही पद्धतीने निर्भय वातावरणात निवडणूक घेण्याचे, तसेच इतर बाबींबद्दल केलेले निवेदन लेखी हमी म्हणून स्वीकारून खंडपीठाने याचिका निकाली काढली होती. परंतु धनंजय मुंडे यांच्या राजकीय दबावापोटी निवडणूक आयोगाने शपथपत्रात नमूद केलेला शब्द पाळला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.