ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दगडफेक करणार्या ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील चौघे अल्पवयीन आहेत. डोंबिवलीतील एका मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण शिबिर चालू होते. शिबिरावर काही जणांनी दगडफेक केली होती. त्यानंतर या प्रकरणी कचोरे संघ शाखेकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
संघ कार्यकर्त्यांच्या शक्तीप्रदर्शनाच्या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम्’, ‘भारतमाता की जय’, अशा घोषणा देण्यात आल्या. सूर्यनमस्कार, दंड प्रशिक्षण, खो खो, कबड्डी यांसह इतर खेळ खेळण्यात आले. शिबिरावर यापूर्वी दोन वेळा अज्ञातांनी दगडफेक केली होती. त्या वेळी चुकून दगड आले असावेत, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले; परंतु पुन्हा दगडफेक झाल्याने गुन्हा नोंदवण्यात आला.