पुणे: शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. मोठ्या ड्रग्ज डिलरसह बाहेरून येणाऱ्या तस्करांवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रोड भागात गस्त घालत आहेत. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर करडी नजर ठेवली जात आहे. सिंहगड रोड भागात अमली पदार्थ विक्रीस आलेल्या उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
अंशुल संतोष मिश्रा (वय २७, रा. बुलढाणा), आर्श उदय व्यास (वय २५, रा. पंतनगर,घाटकोपर, मुंबई), पियूष शरद इंगळे (वय २२, रा. स्पाईन रोड, चिखली,पिंपरी- चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे व त्यांच्या पथकाने केली आहे.
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मिश्रा, व्यास आणि इंगळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ओजीकुश गांजा, १५ ग्रॅम मेफेड्रोन आणि ६२ मिलीग्रॅम एल.एस.डी. असे अमली पदार्थ आढळून आले. अंशुल मिश्राने एका महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा साथीदार आर्श व्यास विमान कंपनीत कामाला (ग्राऊंड स्टाफ) होता. पियूष इंगळे याने संगणक अभ्यासक्रम पूर्ण केलाआहे.