रत्नागिरी: स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीतील शिरगावमध्ये राहिले त्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी. हा जिल्ह्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार टिकवण्याचे दायित्व रत्नागिरीकरांचे आहे, असे उद्गार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘आत्मार्पण दिनी’ येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात ‘सागरा प्राण तळमळला’ हे २ अंकी नाटक सादर करण्यात आले. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर ज्या दामले कुटुंबियांच्या खोलीत राहिले, त्या दामले कुटुंबियांपैकी शैला दामले यांचा सत्कार पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केला.
यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, की ‘‘तत्कालीन सरकारच्या भितीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कुणी जागा देत नसतांना, शिरगावमधील विष्णुपंत दामले यांनी त्यांना रहायला खोली दिली. दामले कुटुंबियांनी जागा देऊन त्यांना साथ दिली, हा जिल्ह्याचा अभिमान आहे. १०० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीरांचा विचार रत्नागिरीत होता. त्यांच्याच विचाराने रत्नागिरी पुढे जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला सर्वाधिक शब्द दिले आहेत. आत्मार्पण दिनानिमित्त चिपळूण आणि रत्नागिरी येथे त्यांच्या जीवनावरील ‘सागरा प्राण तळमळला’ या २ अंकी नाटकाचे प्रयोग झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान नव्या पिढीला या नाटकातून प्रेरणा देणारे ठरेल.’’