आंबेडकरी समाजाचा संयमी संघर्ष महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी – आमदार बाबुराव कदम कोहळीकर
हदगाव, परभणी, आणि बीड येथे घडलेल्या घटना महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याला आव्हान देणाऱ्या ठरल्या. मात्र, या संवेदनशील काळात आंबेडकरी समाजाने संविधानावर असलेल्या निष्ठेमुळे संयमी व जबाबदार भूमिका घेतली, असे प्रतिपादन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले.
संविधानाचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकात्मक संविधान ग्रंथाची विटंबना करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कोहळीकर यांनी केली. या प्रकाराने समाजात निर्माण झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, शासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस धोरण राबवावे, असे त्यांनी विधानसभेत सुचवले.
कोठडीत मृत्यू प्रकरणाचा आढावा घ्या
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी न्यायालयीन यंत्रणेचा आधार घ्यावा, अशी विनंती कोहळीकर यांनी केली. तसेच पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देऊन त्यांना आधार देण्याची मागणीही त्यांनी मांडली.
संविधानावर विश्वास कायम ठेवा – कोहळीकर
या कठीण काळात आंबेडकरी समाजाने घेतलेली संयमाची भूमिका इतरांसाठीही प्रेरणादायी आहे. संविधानाचा आदर ठेवून संघर्ष करणारा समाज नेहमीच मोठ्या बदलाची नांदी ठरतो, असे मत कोहळीकर यांनी व्यक्त केले.
संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळत समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.