अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक विमानं सातत्यानं गुलाबी रंगाचा एक द्रव आगीवर टाकत आहेत. लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग इतकी प्रचंड होती की, तिचा विस्तार होत या आगीच्या तडाख्यात अनेक निवासी वस्त्या आल्या आहेत. या आगीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या संख्या आता २४ झाली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत. अजूनही अनेक ठिकाणी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
लॉस एंजेलिसमधील आग विझवण्यासाठी विमानातून पिंक लिक्विड म्हणजे गुलाबी रंगाचा द्रव टाकला जातो आहे. हा गुलाबी रंगाचा द्रव एक फायर रिटार्डंट आहे. म्हणजेच असा पदार्थ ज्यामुळे आग लागण्यासाठी किंवा आग वाढण्याची प्रक्रिया कमी होते. हा गुलाबी द्रव म्हणजे साल्ट्स किंवा क्षार आणि खतांचं मिश्रण असतं. हा द्रव म्हणजे मुख्यत: अमोनियम फॉस्फेट असलेलं द्रावण किंवा द्रव असतो. आग लागण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
या गुलाबी रंगाच्या द्रवातील रासायनिक मिश्रणामुळे आगीला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. म्हणूनच आग वेगानं पसरू नये यासाठी हा गुलाबी द्रव वापरला जातो. गुलाबी रंग देण्यामागचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे आग लागलेल्या भागात देखील हा गुलाबी रंग स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे लोकांना हे माहित होतं की कोणता भाग आगीच्या तडाख्यात सापडला आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलं जाणारं हे तंत्र वादाच्या भोवऱ्यात देखील सापडलं आहे. कारण या द्रवातील रसायनांचा माणूस आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.