गोवा विधानसभात भाजपाच्या संघटन शक्तीचा विजय...
आता स्वारी महाराष्ट्रावर : फडणवीस
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील विजयावर आनंद व्यक्त केला. पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याने ही निवडणूक जिंकणे माझ्यासाठी आणि पर्यायाने पक्षासाठी प्रतिष्ठेची होती, अशी प्रतिक्रिया श्री. फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, आता माझे लक्ष्य २०२४ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकणे हेच आहे. महाराष्ट्रातील विद्यमान तिघाडी सरकार बिघडले आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायाखाली राहिलेला नाही. मंत्री विविध गुन्ह्यांत सहभागी आहेत. तिन्ही पक्षांची तोंडे तीन बाजूला आहेत. महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी जनाधार नसतानाही गोव्यातील निवडणूक लढवली. तसेच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाआघाडी करण्याच्या वल्गना केल्या. पण सजग गोमंतकीय जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. २०२४ च्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपा दमदार कामगिरी करेल. आणि मित्र पक्षांच्या सहायाने सत्ता स्थापन करेल, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.