अभिनेता सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. याप्रकरणी आताच हाती आलेले महत्त्वाचे अपडेट म्हणजे, महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 5 वाजता ही बैठक होणार आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसांचा याप्रकरणी सुरू असलेला तपास आणि हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याने प्रकरणाचा तपासाला काही एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
मंगळवारपासून याप्रकरणी अनेक घडामोडी बिहार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर होत आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर बिहारमधील 4 पोलिसांची टीम मंगळवारी मुंबईत दाखल झाली आहे.
यामध्ये इंस्पेक्टर मनोरंजन भारती (तपास अधिकारी), इंस्पेक्टर कैसर आलम, सब-इंस्पेक्टर निशांत कुमार, सब-इंस्पेक्टर दुर्गेश कुमार गहलोत या चौघांचा समावेश आहे. त्यांनी याप्रकरणी तपासास सुरुवात केली असून याप्ररणी सर्वात आधी सुशांतची बहिण मितूची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण त्याच्या मृत्यूआधी मितू त्याच्या घरी राहून गेली होती. त्याचप्रमाणे रिया-सुशांतमधील भांडणे आणि तिने त्याला मीडियासमोर एक्सपोज करण्याची दिलेली धमकी याबाबत तिला माहित होते, अशी माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे रिया आणि तिच्यामध्ये कधी संभाषण झाले होते, याबाबत देखील चौकशी करण्यात येईल. कारण रियाने मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अशी माहिती दिली होती की, तिने घर सोडण्यााधी सुशांतच्या बहिणीशी बातचीत केली होती.
सध्या प्राथमिक पातळीवर चौकशी सुरू असल्याची माहिती तिवारी यांनी दिली आहे. दरम्यान रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी जी एफआयआर दाखल करण्यात आली आहे, त्या प्रकरणाची सर्व बाजुंनी चौकशी सुरू राहील, अशी देखील माहिती बिहार पोलिसांकडून मिळते आहे. मुंबई पोलिसांच्या अंधेरी क्राइम ब्रांच याठिकाणी मंगळवारपासून बिहार पोलिसांची ये-जा सुरू आहे. त्यावेळी बिहार पोलिसांचे पोलीस निरीक्षक कैसर आलम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
तर सुशात सिंह राजपूत कुटुंबीयांचे वकिल विकास सिंह यांनी असा आरोप केला आहे की, 'हा गुन्हा काय एका रात्रीमध्ये घडला नाही आहे, पण गेल्या काही कालावधीपासून त्याच्या मनावर नियंत्रण मिळवून करण्यात आलेला हा गुन्हा आहे. सुशांतच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत विश्वास राहिलेला नाही. त्याचे कुटुंबीय बेचैन आहेत. त्यामुळे याची व्यवस्थित चौकशी आवश्यक आहे.