मुंबई- अहमदाबादला जोडणारा बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. गेल्या अनेक दिवसांत या प्रकल्पाला विविध अडचणींचा सामना करावा लागला. जपान देशाच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात एक मोठं कंत्राट लार्सन अॅण्ड टुब्रो (Larsen & Toubro) या कंपनीला मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लार्सन अॅण्ड टुब्रोला कंपनीला 2,500 कोटी रुपयांचं भरभक्कम मोठं कंत्राट मिळालं आहे.
मुंबई आणि अहमदाबाद या दोन प्रमुख शहरांना जोडणारा 'हाय स्पीड रेल कॉरिडोर' (high speed rail corridor) हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. याप्रकल्पांतंर्गत लार्सन अॅण्ड टुब्रोला कंपनीला 2,500 कोटी रुपयाचं मोठे कंत्राट मिळालं आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो ही कंपनी पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. संबंधित कंत्राटाची माहिती शुक्रवारी देण्यात आली आहे. मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणारा हा प्रकल्प अस्तित्वात आला, तर याचा फायदा महाराष्ट्रासोबतच गुजरातलाही होणार आहे. या सुविधेमुळं अवघ्या काही तासांत शेकडो किमीचा प्रवास करता येणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार केला, तर प्रकल्प दोनी राज्यांना मोठा महसूल गोळा करून देवू शकतो.
यावेळी कंपनीने सांगितलं की, या कंत्राटांतर्गत 28 पुलांची निर्मिती, संयोजन, पेंट आणि वाहतुकीचं काम या कंपनीला मिळालं आहे. जपानच्या IHI Infrastructure System (IIS)च्या कन्सोर्टियमच्या माध्यमातून कंत्राट मिळवलं आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो ही भारतातील एक नामवंत कंपनी आहे. गेल्या 82 वर्षांपासून ही कंपनी भारतात कार्यरत आहे. अनिल नाईक हे या कंपनीचे चेअरमन आहेत. ही कंपनी प्रामुख्याने देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी काम करते. यामध्ये मोठं मोठे नागरी प्रकल्प, कंपन्या, रस्ते आणि महामार्ग या क्षेत्रांचा समावेश होतो.