वॉशिंग्टन: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात संताप आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचे अर्थात् पेंटागॉनचे एक माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी या आक्रमणासाठी थेट पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांच्या भाषणाला उत्तरदायी ठरवले आहे.
असीम मुनीर यांनी भाषणात म्हटले होते, की काश्मीरविषयी आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, ती आमची कंठाची नस होती, ती आमची कंठाची नस राहील. आम्ही हे विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांची संघर्षात साथ सोडणार नाही. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन म्हणाले, की या आक्रमणानंतर हे स्पष्ट झाले आहे, की भारताला पाकिस्तानची मान कापण्याची आवश्यकता आहे. याविषयी कोणताही संशय किंवा शंका असू नये.
तसेच रुबिन पुढे म्हणाले, की आम्हांला माहिती आहे, की पाकिस्तान लष्कर - ए - तोयबासह अनेक आतंकवादी गटांचे घर आहे. पहलगामचे आक्रमण हे ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणासारखेच आहे. ते आक्रमण ज्यूंवर होते. आता पहलगाममध्ये मध्यमवर्गीय हिंदूंना लक्ष्य करून पाकिस्तानही तीच रणनीती अवलंबत असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत इस्रायलने हमाससमवेत जे केले, तेच पाकिस्तानसमवेत करणे भारताचे कर्तव्य आहे.