अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक - एक जागा मिळणार होती. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचं दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे.