बिहार: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि षड्यंत्र रचणार्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे. या आतंकवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल. आतंकवाद्यांच्या उरल्यासुरल्या ठिकाणांना मातीत मिसळण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी येथे एका सभेत घोषणा केली.
पंतप्रधान मोदी यांनी व्यासपिठावरूनच आतंकवादी आक्रमणात मृत झालेल्यांना काही मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, ज्या प्रकारे निष्पाप लोकांना मारण्यात आले, त्यामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे. त्यांच्या दुःखात संपूर्ण देश त्यांच्यासमवेत उभा आहे. आक्रमणात कुणीतरी स्वतःचा मुलगा गमावला, कुणीतरी भाऊ गमावला, कुणीतरी जीवनसाथी गमावला. त्यांपैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड, काही मराठी, काही गुजराती, तर काही बिहारचे होते. आज कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे. सध्या उपचार घेत असलेले लोक लवकर बरे व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
या आक्रमणानंतर भारताचा संदेश जगाला देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी इंग्रजीतून केलेल्या भाषणात म्हटले, की आम्ही त्यांना पृथ्वीच्या शेवटच्या कोपर्यात हाकलून लावू. आतंकवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. आतंकवादाला शिक्षा होईल. ‘न्याय सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील’, या संकल्पात संपूर्ण देश एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आपल्यासमवेत आहे. आमच्यासमवेत उभे राहिलेल्या विविध देशांच्या जनतेचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो.