चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील युवा होतकरू शेतकरी दत्तू लक्ष्मण पाटील (वय ३७ वर्ष) या युवा शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दत्तू लक्ष्मण पाटील या शेतकऱ्याने तमगव्हाण येथे राहत्या घरी दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजता धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेत असतांना दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. दत्तु पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
राज्यात जर अशा युवा शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा व योजना या नेमक्या शेतकऱ्यांकडे पोहोचतात का? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. जर शासनाच्या सर्व योजना व शेतकऱ्यांना कर्ज वेळेवर मिळत असेल व त्यांच्या शेतीला हमीभाव व्यवस्थित मिळत असेल, तर त्या शेतकऱ्यांना सावकारी कर्जापासून मुक्तता मिळू शकते. परंतु सरकारी कर्जासाठी अनेक अडचणी व अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार यामुळे शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि खाजगी सावकारांकडून मोठ्या टक्केवारीने पैसे घेतात. परंतु ते कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे अखेर त्यांना असे टोकाचे निर्णय घेऊन आपला जीवन संपवावे लागतात.
ही दुर्दैवी घटना आज चाळीसगाव तालुक्यात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. परंतु आता सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून एकच मागणी होत आहे, की सरकारने ह्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी. कुटुंबाला कर्जातून मुक्त करावं. प्रशासनाने या युवा शेतकऱ्यांच्या परिवाराला कशा पद्धतीने मदत करता येईल? याकडे बघावे. परंतु आज घरातील लहान चिमणी आज बापा विना पोरके झाले आहे.