मिरा - भाईंदर: मिरा - भाईंदरमध्ये बेकायदेशीररित्या नवघर, काशिगाव व नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहत असलेल्या १ पुरुष व ४ बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष मिरा - भाईंदर यांनी कारवाई केली आहे. नवघर पोलीस ठाणे हद्दीतील होली कॉम्पलेक्स, युरेका क्लासेस जवळ, दिपक हॉस्पीटलच्या पाठीमागे, काशिगांव पोलीस ठाणे हद्दीतील वेस्टन पार्क, काशिगाव, काशिमिरा या ठिकाणी बांगलादेशी नागरीक वास्तव्यास आहेत.
तसेच नयानगर पोलीस ठाणे हद्दीतील एल.बी.एस रोड, अस्मीता क्लब, नयानगर या ठिकाणी कामासाठी बांगलादेशी नागरीक येत असून ते विनापरवाना राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी गुरूवारी वेगवेगळे साफळे रचून १ पुरुष व ४ महिला अशा एकूण ५ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी ते बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे यांनी सविस्तर पंचनामा केला. ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे यांनी दिली आहे.