बीड: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडीओ बघितले म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. यात अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला आठ टाके पडले होते. अशोक मोहितेला मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पथकं तयार करण्यात आली होती. अखेर काल रात्री उशिरा कर्नाटकमधून या दोघांना अटक करण्यात आली आहे.
बीडच्या केज तालुक्याच्या करनळी गावात ही घटना घडली. अशोक मोहिते नावाचा तरुण हा खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडीओ पाहत होता. त्याचवेळी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोन तरुणांच्या नजरेस अशोक मोहिते पडला. त्याने अशोकला वाल्मिक कराड याचे व्हिडीओ का पाहातो अशी विचारणा केली. यानंतर त्या दोघांनीही अशोक मोहितेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अशोकला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला मार लागला. डोळ्याला सूज आली. तसेच पाठीवरही मुका मार लागला. अशोक मोहितेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर लातूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अशोक मोहितेला मारहाण करणारे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे दोघेही फरार असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे बोललं जात आहे. अशोक मोहितेला मारहाण केल्यानंतर हे दोघेही फरार झाले होते. याप्रकरणी धारुर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आली होती. अखेर आरोपींना कर्नाटकमधून अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.