संघमित्रा सेवा प्रतिष्ठान व महिला समन्वयन समितीच्या संयुक्त वतीने येत्या, 10 डिसेंबर 2023 रोजी रेशीमबाग येथील स्मृती मंदिर येथे नेत्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील नेतृत्वधारी महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आगामी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संस्कार भारतीच्या अध्यक्ष व नेत्री संमेलनाच्या संरक्षक कांचनताई गडकरी यांच्या अध्यक्षतेत त्यांच्या निवासस्थानी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विविध क्षेत्रातील सुमारे शंभर नेतृत्वधारी महिला व आयोजन समितीच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात नेत्री संमेलनाच्या मार्गदर्शक निवृत्त न्या. मीरा खडक्कार, अॅड.सिरपूरकर, नेत्री संमेलन अध्यक्ष रुचिका जैन, नागपूर महानगर समन्वयिका अॅड पदमा चांदेकर, संमेलन संयोजिका कल्याणी काळे व संमेलन स्वागत समिती सचिव श्रुती गांधी यांची उपस्थिती होती.
मीरा खडक्कार यांनी नेत्री संमेलनाबाबत माहिती दिली. एकोणीसाव्या शतकात महिला नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर स्त्रीमुक्ती, स्त्री अधिकार हे विषय चर्चिले जाऊ लागले. आज अनेक क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे, त्यावर काय उपाय केले जाऊ शकतात, यावर नेत्री संमेलनामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कांचनताई गडकरी यांनी नेत्री संमेलनामध्ये सर्व क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत सूचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी काळे यांनी केले तर प्रास्ताविक अॅड. पद्मा चांदेकर यांनी केले.