नागपूर: एकीकडे पूजा स्थळ कायद्याने हिंदूंचा न्याय मागण्याचा अधिकारच हिरावून घेतला आहे, तर दुसरीकडे ‘वक्फ’ कायद्याने हिंदूंच्या भूमी बळकावण्याचा पाशवी अधिकार अन्य धर्मियांना बहाल केला आहे. वक्फ बोर्डाकडून अवैधरित्या बळकावलेल्या भूमीही हिंदु कायद्याने परत मिळवू शकत नाही किंवा त्याविरुद्ध दादही मागू शकत नाही. हे दोन्ही कायदे रहित करणे, हे हिंदूंचे प्राधान्य असले पाहिजे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. नागपूर आयोजित महाराष्ट्र मंदिर - न्यास परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते.
महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, श्री टेकडी गणपति मंदिर, नागपूर, श्री जगदंबा देवस्थान कोराडी, श्री पंचमुखी संकटमोचन हनुमान मंदिर, हिल टॉप दुर्गामाता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर शहर आणि तालुक्यातील २५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त अधिवेशनाला उपस्थित होते.