पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशिवाय मराठीचा विचार आपण करूच शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीसाठी जी माया दिली, जो शब्दकोष दिला, जो शब्दांचा खजिना दिला, ते मराठीचे सौंदर्य आहे. या साहित्य संमेलनाविषयी अनेकांनी वाद निर्माण केले. वाद, प्रतिवाद झालाच पाहिजे. मराठी माणसाला कलह करायला आवडतो. त्यातून वैचारिक मंथन होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या तिसर्या ‘विश्व मराठी संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात हे संमेलन होणार आहे.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, की आज सर्वत्र कृत्रिम बुद्धीमत्तेचा बोलबाला आहे. त्याचा वापर करून मराठीचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे. एआयच्या युगात आपण जर ‘स्मॉल लँग्वेज मॉडल’मध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य घातले, तर येणार्या पिढीला साहित्यिकांनी काय केले, ते समजेल. पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याची मराठी भाषा प्रमाण मानली जाते. मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की ‘‘आम्ही मराठीचे कार्यकर्ते म्हणून कार्य करतो. आम्ही भाषेचे कार्यकर्ते आहोत. मराठी माणूस कुठेही असला, तरी तो दुधात साखरेसारखे काम करतो.’’ उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘मराठी भाषा आता महाराष्ट्र सीमेपुरती राहिलेली नाही. ती जगभर आहे. मराठी माणूस हा कधीही संकटाला घाबरणारा नाही. सरकार म्हणून कर्नाटकातील, तसेच देहलीतील मराठी शाळांना आर्थिक साहाय्य करत आहोत.’’