पिंपरी - चिंचवड: पिंपरी - चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिलामध्ये कारवाई करत चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. एजंट महिला ग्राहकांना कासारसाई, लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगत त्यानंतर परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली की, एक परदेशी महिला एजंट ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करून लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. त्यानंतर परदेशी महिलांना तिथे घेऊन जात त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला असता, संबंधित परदेशी महिलेने एका ग्राहकाला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कासारसाई येथे एक व्हिला बुक करण्यास सांगितले. व्हिला बुक केल्याचे एजंट महिलेला सांगितले असता ती चार परदेशी महिलांना घेऊन आली. त्यानंतर पोलिसांनी एजंट महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण २० हजार २० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. तसेच चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.