सांगोला: राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी वाढ, रोजगाराची समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची पश्चिम बंगाल, आसामसारखी स्थिती होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, तसेच या घुसखोरांना साहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज बुधवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी तहसीलदार संतोष कणसे साहेब यांच्याकडे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या नावे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे, की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणार्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता. नवी मुंबई, ठाणे, सोलापूर,पिंपरी-चिंचवड आदी शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १८ हजारांहून अधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. अशीच स्थिती राज्यभरात आहे. खरेतर ही आकडेवारी म्हणजे हिमनगाचे टोक आहे. बांगलादेशी घुसखोर ही समस्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे.
तसेच त्यासाठी राज्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवावी; या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ / ‘कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे तयार करणार्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. उद्या हेच बांगलादेशी घुसखोर वाढत जाऊन भारतात छोटे बांगलादेश निर्माण करून तेथील हिंदूंवर असेच अत्याचार करतील, ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर या प्रकरणी सरकारने आताच कठोर पावले उचलायला हवीत, असे निवेदनात म्हटले आहे.