शिर्डी: शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतांनाच तरुणावर चाकूने वार करण्यात आले आहे. निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मुलावर हा हल्ला करण्यात आला आहे. काहीचं दिवसांपूर्वी निवृत्त नगरपालिका कर्मचाऱ्याला गुंडांकडून धमकी मिळाली होती, त्यानंतर त्यांच्या ३५ वर्षांच्या मुलावर चाकूने सपासप वार करण्यात आले आहे. शिर्डी शहरातील श्रीरामनगर परिसरात अज्ञातांनी भाजी आणि धान्य विक्रेत्या तरुणावर वार केले. जखमी तरुणावर साईबाबा सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मागच्याच आठवड्यात शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांवर हा हल्ला करण्यात आला. तिघंही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते, यावेळी दबा धरुन बसलेल्या मारेकऱ्यांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिर्डी ग्रामस्थानी निषेध ग्रामसभा घेऊन शहरातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन झाले नाही तर पोलीस ठाण्यातला टाळी ठोकू असा इशारा देण्यात आला होता. ग्रामसभेला २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा पाच सहा गुंडांनी मिळून त्यांच्या दुकानावर धुमाकूळ घालत एकावर चाकुने हल्ला केला आहे.
या तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. हल्ल्याच्या या घटनेनंतर शिर्डीमधील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. वाढत्या गुन्हेगारीविरोधात शिर्डीतील जनता आक्रमक झाली आहे. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांकडून शहरात कारवाईचा धडाका सुरू असतांनाच चाकू हल्ल्याने शिर्डी हादरली आहे. घटनेची माहिती समजतात शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.