पुणे: बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली.
1 डिसेंबर या दिवशी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, ससाणे नगर, हडपसर या ठिकाणी या संदर्भातील आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला आणि शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी केली. हिंदूंवरील हे अत्याचार रोखले नाही, तर त्याचे लोण भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून हिंदूंना भारत सरकारकडून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षाही समितीने व्यक्त करण्यात आली.