नवी दिल्ली: हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अजमेर दर्गा वाद प्रकरणातील फिर्यादी असणारे विष्णु गुप्ता यांना ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या प्रकरणी नवी दिल्लीमधील बाराखंभा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विष्णु गुप्ता म्हणाले की, मला नुकतेच २ दूरभाष आले आहेत आणि दूरभाष करणार्यांनी मला ठार मारण्याची धमकी दिली आहे. कॅनडाहून दूरभाष आला. दूरभाष करणार्या व्यक्तीने सांगितले की, ‘अजमेर दर्ग्याचा खटला प्रविष्ट करून तुम्ही मोठी चूक केली आहे आणि आता तुमचे डोके कापले जाईल.’ मला देशातून अशाच प्रकारचा दूरभाष आला. मला सांगायचे आहे की, मी अशा धमक्यांना घाबरत नाही. आम्ही या लोकांकडून घाबरून जाऊ शकत नाही आणि आम्ही आमच्या कायदेशीर अधिकाराची मागणी करत आहोत; म्हणून आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे.
मी कुणाच्या भावना दुखावल्या नाहीत आणि मला तसे करायचेही नाही. आम्ही केवळ आमचा हक्क मागितला आहे; कारण अजमेर दर्गा हे महादेव शिवाचे मंदिर आहे आणि आम्ही ते कायदेशीर लढाईद्वारे परत घेऊ. या प्रकरणात सर्व पक्षांना नोटीस देण्यात आली असून लवकरच त्याचे सर्वेक्षणही केले जाईल.