अहिल्यादेवीनगर: रामभक्त हनुमानाने लंकेचे दहन केले. उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्ताने मतदारांनी विरोधकांच्या लंकेचे दहन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
नौटंकी करून कोणी निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी काम करावे लागते. असा टोला विरोधी उमेदवाराला लगावत डॉ. सुजय विखे यांचा विजय पक्का असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उमेदवार सुजय विखे पाटील यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचे बीज रोवले. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला. आता या परंपरेचा वारसा डॉ. सुजय विखे पाटील पुढे चालवत आहेत. लोकसभेत या मतदार संघातील किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते मांडतात. येथील मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतात हा इथला इतिहास असून डॉ. सुजय यांच्या नावातच जय आहे. त्यामुळे त्याचा पराजय होऊ शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे. कारण पंतप्रधानांनी आपले जीवन देशाला समर्पित केले असून देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीतील कुणामध्येही नसल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
या मतदारसंघातून सुजय विखे पाटील तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहेत. त्यामुळे इथे "नो लंके ओन्ली विखे" अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नगर जिल्ह्यात सहा आणि नाशिक जिल्ह्यात एक अशा सात तालुक्यामध्ये 122 गावांना आपण पाणी दिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मावळमध्ये महायुतीचे शक्तिप्रदर्शन...
मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या प्रचार रॅलीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिपक केसरकर, भाजप नेते प्रविण दरेकर उपस्थित होते.