देहू: जगद्गुरु तुकाराम महाराजांची पवित्र भूमी म्हणून ओळखल्या जाणारी देहू नगरीमध्ये देहुनगर पंचायत हद्दीतील सरकारी गायरान वाचवण्यासाठी जगदगुरु तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या महाद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
देहू नगररपंचायतीच्या हद्दीत गायरानाची सुमारे दीडशे एकर जागा शिल्लक आहे. या जागेपैकी ५० एकर जागा पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयास देण्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू आहेत. मात्र ही जागा देण्यास देहूकर ग्रामस्थ, देहू संस्थान आणि नगरपंचायत सदस्यांचा विरोध आहे. भविष्यात सरकारी गायरान जागेवर नगरपंचायत कार्यालय पालखीतळ वाहन क्रीडांगण भक्तनिवास असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयास जागा देण्यास देहूकरांचा त्रिव विरोध आहे.
या सर्वांचा विरोध असूनही शासनाकडून पोलीस आयुक्तालयास जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत तसेच देहू नागरिकांच्या वतीने जागा देऊ नये यासाठी शासकीय शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच दोन वेळा मोजणीस नागरिकांनी विरोध केलाय.
पिंपरी - चिंचवडच्या हवेली अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना निकम यांनी उपोषण स्थळी भेट दिली तसेच उपोषण सोडण्याची विनंती करून शासनाकडे म्हणणे मांडण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. मात्र देहूतील गायरान येथील जागा देण्याचा हट्ट प्रशासकीय माध्यमातून सुरू झाल्याने संताच्या भूमीत हरिनामाचा जप करणाऱ्या वारकरी संप्रदायातील देहूकरांवर स्वतःची भूमी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं असल्याने ही खेदजनक बाब असल्याचं मत देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी व्यक्त केला आहे.