धाराशिव: धाराशिव येथे येथील कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशांची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली होती; मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कत्तलखाना चालवण्यावर कारवाई करण्याऐवजी ही माहिती प्रसारित केली. यामुळे कत्तलखान्यातील जनावरे अन्यत्र हलवण्यात आली, असा आरोप करत गोरक्षकांनी ३ दिवस येथील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून उपोषण केले. शेवटी पोलिसांनी १९ एप्रिल या दिवशी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गोरक्षकांनी उपोषण मागे घेतले आहे.
या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी, तसेच कत्तलखाना बंद करण्यात यावा, या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात गोरक्षकांनी १७ एप्रिलपासून उपोषण चालू केले होते. या उपोषणाची माहिती सर्वत्र प्रसारित झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी उपोषणकर्त्या गोरक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र गोरक्षकांनी कत्तलखान्यावरच्या कारवाईचा आग्रह धरला. शेवटी पोलिसांनी अवैध कत्तलखाना तोडण्याच्या संदर्भात लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.