मडगाव: कोकण रेल्वे पोलिसांनी गुरूवारी दि. २० मार्च रोजी मोठी कारवाई करत अल्पवयीन मुलाकडून तब्बल ८.१८ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत ८.१८ लाख रुपये असल्याची पोलिसांनी सांगितले आहे.
मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ही कारवाई करण्यात आली आहे. मुलगा या प्लॅटफॉर्मवर उभा होता. पोलिसांनी मुलाच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून चौकशी केली असता गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. चौकशीत मुलगा अल्पयवीन असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला अपना घरात पाठवलं आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. गांजा कुठून आणला? तो कुठे नेला जाणार होता? याचाही शोध घेतला जात आहे.
कोकण रेल्वे पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात कठोर पावलं उचलली जात असून, रेल्वे मार्गांद्वारे नशा पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी तपासणी अधिक तीव्र करण्यात येत आहे.